नगर भूमापन शाखा
ही शाखा राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील ठरविण्यात आलेल्या हद्दीतील मालमत्तांच्या नगर भूमापनाचे कामाशी संबंधित आहे. नगर भूमापन नकाशे आणि मालमत्ता पत्रकांच्या स्वरूपात नगर भूमापनाच्या नोंदी ठेवण्यात येतात. विभागामार्फत आतापर्यंत गावठाण गावे, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्राचे नगर भूमापन करण्यात आले आहे. सन 2000 पासून विभागाकडून महापालिका क्षेत्रामध्ये खासगी संस्थांची मदत घेऊन नगर भूमापनचे काम करण्यात येत आहे. तसेच 61 नगरपरिषदांच्या नगर भूमापनाचे काम प्रगतीपथावर आहे. मिळकत पत्रिकांच्या संगणकीकरणासाठी एनआयसी, पुणे यांच्या मदतीने ईपीसीआयएस ही आज्ञावली विकसित करण्यात आलेली आहे. मालमत्ता पत्रकांच्या ऑनलाइन म्युटेशनची प्रक्रियाही नुकतीच सुरू झाली आहे.
तत्कालीन ब्रिटीश सरकारला नगरपालिका प्रशासनाच्या अनुषंगाने शहरे आणि महानगरांच्या भूमापनाची आवश्यकता लक्षात आल्यानंतर ब्रिटिश राजवटीच्या अगदी सुरुवातीच्या काळात नगर भूमापनाचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळच्या ब्रिटीश सरकारने असे प्रतिपादन केले होते की, शेतजमिनींचे भूमापन करण्याइतकेच शहरे आणि गावातील नगर भूमापन करणे हे सुध्दा सरकारचे कर्तव्य आहे.मुंबई इलाख्यामध्ये सन 1867 मध्ये पुर्वीचा सन 1865चा कायदा शहरे आणि महानगरांमध्ये लागू करण्याबाबत तरतूद करण्यासाठीचा कायदा पारित करण्यात आला. त्यानुसार मुंबई जमीन महसूल अधिनियम 1879 मधील तरतुदीनुसार 2000 पेक्षा जास्त आणि2000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचे नगर भूमापन विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून केले गेले.
नगर भूमापन करण्यासाठी प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर हे तीन उद्देश होते.असे भूमापन ज्या क्षेत्रापर्यंत विस्तारू शकते त्यास गाव, शहर किंवा महानगर यांची हद्द असे संबोधण्यात आले. भूमापनाचे प्रत्यक्ष कामकाज अनेक भागांमध्ये करण्यात आले.यामध्ये प्रत्यक्ष मोजणी करून नकाशा तयार करणे समाविष्ट आहे, म्हणजे ट्रॅव्हर्सिंग, सविस्तर मोजणी आणि सर्व मिळकतींची योग्य हद्द आणि समोरील बाजू ठरवून त्यांचे मालकीहक्क ठरवण्यासाठीचे चौकशी काम यावरून मालमत्ता पत्रकांच्या स्वरुपात हक्कांची नोंद करण्यात आली.विदर्भ विभागातील जिल्हयामध्ये सन १९१८ पासून बहुतांश प्रमुख शहरांतील नझुल जमिनींचे नियमितपणे भूमापन करून परिरक्षण करण्यात येत आहे.

मुंबई बेटाच्या बाबत नगर भूमापनाचा पहिला प्रयत्न सन 1670 - 71 मध्ये झाला होता, परंतु हे भूमापन पूर्ण झाले नाही.सन 1811 - 1827 पर्यंत बेटाच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागाचे बारकाईने नगर भूमापन केले गेले आणि विविध तपशील दर्शविणारी नोंदवही तयार केली गेली.उत्तरेकडील अर्ध्या भागाचे केवळ भौगोलिकदृष्ट्या भूमापन करण्यात आले होते आणि नकाशावर केवळ वेगवेगळे धारणाधिकार दर्शविण्यात आले होते. लेफ्ट. कर्नल लॉफ्टन यांनी सन 1865-1872 मध्ये मुंबई बेटाच्या पुढील महसूली मोजणीचे काम केले. या मोजणीवेळी, बेटाच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागासाठी 1 इंचास 40 फुट आणि बेटाच्या उत्तरेकडील अर्ध्या भागासाठी 1 इंचास 100 फुट या परिमाणामध्ये नकाशे तयार करण्यात आले. तसेच क्षेत्रफळ, भोगवटादार यांचे नाव आणि प्रत्येक भूभागाचा धारणाधिकार दर्शविणा-या नोंदवह्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर सन 1915 ते 1918 या कालावधीमध्ये मुंबई शहराचे भूमापन करण्यात आले, कारण कर्नल लॉफ्टन यांनी केलेल्या बेटाच्या भूमापनानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेली होती. सद्यस्थितीत नगर भूमापनाच्या या अभिलेखांचे परिरक्षण करण्यात येते.